सिरोंचा भूकंप हा नैसर्गिक नसून कॉर्पोरेट खाण माफियांचा प्रायोजित विनाश- किशोर तिवारी
सिरोंचा भूकंप हा नैसर्गिक नसून कॉर्पोरेट खाण माफियांचा प्रायोजित विनाश- किशोर तिवारी
दिनांक ३ सप्टेंबर २०२६
आज पहाटे ४:३६ वाजता सिरोंचा तालुक्यात झालेला ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप हा निसर्गाचा अपघात नाही, तर गडचिरोलीच्या जल-जंगल-जमिनीवर गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या अमानुष, अनियंत्रित आणि आदिवासीविरोधी खाणकामाच्या धोरणाचा थेट परिणाम आहे. हा निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा आहे.
सरकार सांगते की भूकंपाचे केंद्र १० किमी खोलीवर आहे, म्हणून खाणकामाशी संबंध नाही. हा शुद्ध थापेबाजीचा प्रकार आहे. वैज्ञानिक सत्य लपवले जात आहे.
१. गडचिरोली हा संवेदनशील भूकंप क्षेत्रात आहे, हे सरकारलाच माहित आहे:
माजी राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे प्रमुख यांनीच स्पष्ट केले आहे की, "गडचिरोली हा सिस्मिक झोन-३ मध्ये येतो आणि या भागातील भूकंपाचे स्थान गोदावरी व्हॅली फॉल्ट सिस्टम जवळ आहे. झोन-३ मध्ये ५ तीव्रतेपर्यंत भूकंप येऊ शकतो". सिरोंचा, अहेरी हेच त्या फॉल्ट लाईनवर आहे. असे असूनही सरकारने या नाजूक भागाला खाणकामासाठी विकले आहे. eae1
हा पहिला धक्का नाही. हा गेल्या पाच वर्षांतील पाचवा भूकंप आहे. वारंवार हादरे बसत असताना सरकार डोळे मिटून बसले आहे. 221abf11
२. पेसा (PESA) कायद्याची पायमल्ली आणि आदिवासी देवतांचा अपमान:
गडचिरोली जिल्ह्यातील १५६७ गावांपैकी १३११ गावे पेसा कायद्याखाली येतात. पेसा कायद्यानुसार ग्रामसभेच्या परवानगीशिवाय खाणकाम होऊ शकत नाही. तरीही ७० गावांच्या ग्रामसभांनी ठराव करून खाण परवाने रद्द करण्याची मागणी करूनही, सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांना जमिनी वाटल्या.
सुरजागडची टेकडी आदिवासींचे दैवत आहे. तेथे तेंदू पत्ता, मध, मोहाचे झाड यावर जगणारा आदिवासी आज उध्वस्त झाला आहे. सरकार म्हणते "जिल्ह्यात उद्योग नाही म्हणून खाणी हव्यात" पण हा विकास कोणासाठी?
३. सुरजागड ते सिरोंचा - ९३७ हेक्टर जंगलाचा बळी आणि पर्यावरणाचा महाविनाश:
२००७ मध्ये लॉयड मेटल्सला केवळ ३४८.०९ हेक्टरवर परवानगी दिली होती. आता केंद्र सरकारच्या पर्यावरण समितीने त्याच कंपनीला १० दशलक्ष टनांवरून २६ दशलक्ष टनांपर्यंत उत्पादन दुप्पट करण्याची शिफारस केली आहे.
त्यासाठी ९३७.०७७ हेक्टर राखीव वनजमीन वळवण्यास अंतिम मान्यता दिली आहे. म्हणजे लाखो झाडांची कत्तल, भूगर्भातील पाण्याचा उपसा आणि रोज हजारो टन स्फोटकांनी ब्लास्टिंग. या ब्लास्टिंगमुळे सुप्त फॉल्ट लाईन जागृत होऊन टेक्टॉनिक स्ट्रेस ट्रिगर होतो, हेच सिरोंचाच्या भूकंपाचे खरे कारण आहे. 64787c77
४.खनिज निधीची लूट - आदिवासींच्या नावावर रस्ते कंपन्यांसाठी:
खाणकामामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींच्या पुनर्वसनासाठी असलेला जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधी हा पायाभूत सुविधांसाठी वापरला जात आहे, पुनर्वसनासाठी नाही, ही अधिकृत कबुली आहे. म्हणजे आदिवासीच्या छातीवर खाण खोदायची, त्याच पैशाने कंपनीसाठी महामार्ग बांधायचे आणि आदिवासीला दवाखाना, शाळा, पिण्याचे पाणीही द्यायचे नाही. हा सरळ सरळ आदिवासींच्या हक्कांवर दरोडा आहे.
मागण्या:
१. सर्व हेवी ब्लास्टिंग तात्काळ बंद करा: जोपर्यंत NGRI आणि GSI कडून सिरोंचा-गोदावरी फॉल्ट लाईनचे स्वतंत्र सिस्मिक ऑडिट होत नाही, तोपर्यंत सुरजागड, हेडरी, सिरोंचा परिसरातील सर्व स्फोट बंद करा.
२. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली SIT चौकशी: भूकंप आणि खाणकामाचा संबंध, PESA उल्लंघन आणि DMF गैरव्यवहार यावर श्वेतपत्रिका काढा.
३. पेसा कायद्याची कडक अंमलबजावणी: ७० ग्रामसभांच्या ठरावाचा आदर करून सर्व बेकायदेशीर खाणपट्टे रद्द करा आणि आदिवासींच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन देऊ नका.
४. आपत्ती व्यवस्थापन नाही, तर खाण व्यवस्थापन सुधारा: लोकांना घाबरू नका सांगण्यापेक्षा, ज्या खाणकामामुळे जमीन हादरत आहे, तेच थांबवा.
"लातूर आणि कोयनेचा इतिहास विसरू नका. आज ३.६ आहे, उद्या ५.० झाला तर सिरोंचा-अहेरीतील मातीची घरे, आश्रमशाळा आणि हजारो आदिवासी जीव धोक्यात येतील. हा विकास नाही, हा कॉर्पोरेट नरसंहार आहे. सरकारने तात्काळ खाण माफियांना आवर घातला नाही, तर विदर्भ जन आंदोलन समिती हजारो आदिवासींना घेऊन थेट खाणींवर धडक देईल आणि नागपूर-मुंबई महामार्ग रोखेल."
- किशोर तिवारी, संस्थापक,
विदर्भ जन आंदोलन समिती
संपर्क: नागपूर कार्यालय
-----------------------------------------------------------------------

Comments
Post a Comment